महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध,नामवंत ज्येष्ठ लाडके कवी अशोक बागवे सरांची एक अप्रतिम काव्य रचना…

कोरोनाष्टक
=======
झाड हादरून गेलं आहे
मुळांना कीड लागल्याचा संशय
बळावत चालला आहे

फुलांना सर्दी नि फांद्यांना खोकला
छातीत घुसमटत
धाप लागली आहे मातीला
निस्तेज प्रकाश पानांवरून सरकत
विझून जातो
नि वारा जेमतेम इकडून तिकडे
आंधळ्यासारखा हेलपाटत वावरतो
ठेच लागून पाचोळा
मुक्याने भिरभिरतो आहे

आकाश ठणकतंय
धरती सुन्न
भरवसा उडून गेलाय
एकमेकांवरचा

आणि पोरकेपणा
दत्तक घेतल्या अपत्यासारखा
वारसहीन
■■
अशोक बागवे