उन्मेष बागवे

समाजपरीवर्तनाचा ध्यास, अभ्यास व प्रयास

जागरण स्मार्ट ठाण्यासाठी

गेल्या पंधरा-वीस वर्षात ठाण्याने एक मोठे स्थित्यंतर अनुभवले आहे, शहराने मोठा विकास साधला पण या विकासाचा चेहरा भयाण होत चालला आहे. जुन्या शहराचा दिमाख आता दिसत नाही आणि रहिवाशी जीव मुठीत ठेऊन रहात आहेत, नागरी प्रश्न आणि समस्या गंभीर होत चालल्या आहेत आणि त्यावरील उत्तरे आणखी बिकट प्रश्न उभे करीत आहेत. स्टेशन परिसरातील वाहतूक सुधारण्यासाठी केलेली SATIS योजना हे त्याचे जिवंत उदाहरण.

ठाणे शहरात आल्या आल्या शहराचे विचित्र दर्शन होते. बसेससाठी मोठ्या रांगा, प्रचंड गर्दीतून बसमध्ये प्रवेश शक्यच नाही. बसेस वेळेवर येत नाहीत, पकडलेली बस एव्हढी मोठी कि कुठेतरी वाहतूक कोंडीत अडकते. जास्त पैसे खर्च करायची तयारी आहे म्हणून रिक्षा पकडावी तर रिक्षा मिळता मिळता नाकी नऊ येतात. स्टेशनबाहेर रस्त्यावर आणीबाणीची परिस्थिती, भरपूर फेरीवाले, बेधुंद गाडीवाले, फुटपाथवर व्यवसाय करणारे यातून अपघात न होता चालणे मुश्कील. त्यातून गल्लो-गल्ली, नाक्या-नाक्यावर, चौका-चौकात या ना त्या निमित्ताने वाहतुकीला आणि लोकांना त्रास देणारे मंडप, न्यायालयाला न जुमानता होणारे ध्वनी-प्रदूषण आणि लावलेल्या होर्डींग्ज… मोकळ्या मैदानावर भरणारी नियमित प्रदर्शने, वाढती झोपडपट्टी, बकाल सर्व्हिस रोड, अनधिकृत बांधकामांना संरक्षण, हॉस्पिटल्स आणि शाळा यांची वाईट अवस्था, इतक्या वर्षात स्वत:ची पाणी योजना न केल्याने पिण्याच्या पाण्याच्या जोडीला अनेक समस्या, वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या अनेक बसेस दुरुस्तीअभावी आगारात पडून आहेत. एव्हढ्या मोठ्या शहरात महापालिकेचे एकच इस्पितळ…

ठाणे महापालिकेतील “राडे” वेगळेच. योजना कितीही अव्यवहार्य असली, पैशाचा नाश करणारी असली तरी आयुक्त ठरवतील तेच होणार. अनेक उदाहरणे आहेत… खाडीतील अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण करणारा अव्यवहारी शुद्धीकरण प्रकल्प किंवा ठाण्यात जिथे गरज नाही तेथील रुंद होणारे रस्ते (खरी गरज स्टेशन परिसरात असताना), किंवा गरज नसताना पालिकेच्या सहकार्याने बांधलेले तीन उड्डाणपूल (ज्यावरून आज १० टक्के वाहने देखील जात नाहीत). कांदळ-वनाचा नाश करून खाडीवर चौपाटी करणारे अनावश्यक प्रकल्प, बेमुसार वृक्षतोड करणाऱ्या बिल्डरांना साथ देणारे वृक्ष-प्राधिकरणाचे (का वृक्ष-पाडीकरण) अध्यक्ष पालिकेचे आयुक्त आहेत, जे केवळ बिल्डरांसाठी काम करतात म्हणून इथल्या आमदारांना हवे आहेत म्हणून राज्य सरकारवर दबाव आणून त्यांची मुदत वाढवली जाते, हे वास्तव आहे. महापालिकेत जनतेची कामे होण्याची शक्यता फार कमी, दिलेल्या पत्रांना साधे उत्तर मिळण्यासाठी झटावे लागते, ठराविक नगरसेवकांचा प्रशासनावर इतका दरारा की नगरसेवकांच्या चौकडीच्या टेबलावरूनच कागद सरकला तरच काम होईल. शिपायापासून कोणाचा किती वाटा, भ्रष्टाचाराची टक्केवारीचे आकडे तर आता जाहीर गुपित. 1997 च्या नंदलाल समितीने वाभाडे काढून सुद्धा, अनधिकृत इमारती पडून जीवहानी होऊन सुद्धा भ्रष्टाचार “छप्पर फाडके” आणि पाच वर्षात ठाण्यातील नगरसेवक, आमदार आणि अधिकारी गब्बर होत चालले आहेत.

नागरिकांचा सहभाग नसल्याने आणि नगर-विकास व नागरी समस्यांवरील तज्ञ किंवा अभ्यासू व्यक्तींशी सल्ला-मसलत होत नसल्याने ठाण्यातील दिखाऊ योजना व त्यातून होणारा विकास शहराला भकास करीत आहे, सर्वंकष नियोजनाचा अभाव असल्याने व सर्व प्रशासन बिल्डरांसाठी काम करीत असल्याने नियोजन व अंमलबजावणी या दोन्ही बाबतीत अपयश दिसू लागले आहे.

या ठाण्यातून जे आमदार निवडून आले आहेत त्यांचे नातेवाईक खासदार, नगरसेवक आहेत, जे खासदार आहेत, त्यांचे सगळे घराणे नगरसेवक आहेत तरी ठाण्यात नागरी समस्या बक्कळ आहेत, भ्रष्टाचार प्रचंड आहे, विस्थापितांच्या समस्या सुटत नाहीत, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती चुकीच्या धोरणामुळे विकसित होत नसल्याने मूळ ठाणेकर मेटाकुटीस आले आहेत. हि परिस्थिती बदलू शकते, त्यासाठी जागरूक नागरिकांनी राजकारणात येण्याची गरज आहे, जी ठाण्याची परंपरा आहे, नरेंद्र बल्लाळ यांची नागरी विकास आघाडी, कॅप्टन बाबा चव्हाण यांची जाग, संजीव साने-मिलिंद बल्लाळ यांचे सिटीझन फोरम हे यापूर्वीचे यशस्वी प्रयत्न, त्यांनी ठाण्याच्या, बिल्डर-कंत्राटदार-लोकप्रतिनिधी-अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवून अनेक प्रकरणे उजेडात आणली, याचाच पुढचा भाग म्हणून ठाणे मतदाता जागरण अभियान, हि नागरिकांची चळवळ ठाण्यात सुरु झाली, माझ्या शहरावर माझाही अधिकार म्हणत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व अंगाने शहरातील नागरी समस्यांवर संवाद, संघर्ष व संघटन हा मार्ग चोखाळत नागरिकांना एकत्र करीत आहे. नागरी आघाडी, जाग आणि सिटीझन फोरम यांच्या पुढचे पाऊल टाकत आहे, नगरपालिकेच्या निवडणुकीत लोक-उमेदवार उभे करून दक्ष, प्रामाणिक नागरिक व नगर-रचना संबंधित विषयातील तज्ञ नगरसेवक म्हणून निवडून आणून देण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्यामुळे सर्व प्रस्थापित पक्षांच्या हितसंबंधाच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जनतेत जाऊन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सभा, निदर्शने, मोर्चा, धरणे अशी रस्त्यावरची लढाई करीत, विस्थापितांना, क्लस्टर योजनेमध्ये होणारी संभाव्य हसवणूक/अन्याय रोखण्यासाठी संघटन करीत आहे, बेसुमार वृक्ष-तोड आणि मेट्रोची लढाई न्यायालयात देखील नेली आहे. या अशा प्रकारच्या जन-चळवळीतून लोकांच्या पाठींब्यावर तज्ञ व्यक्ती महापालिकेत निवडून गेली तर शहराच्या राजकारणात खूप चांगले बदल घडू शकतात, मग smart म्हणजे “चालू” लोकांची नसेल तर तज्ञांची आणि चांगल्या लोकांची smart city होईल. चांगले नागरिक एकत्र असतील तर त्यांची नैतिक ताकद हे गल्लीतील गुंडाना आणि पैशाच्या ताकदीला शह देऊ शकते, हे अजूनही दिसू शकते.

मी, उन्मेष बागवे

महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी, समाजपरीवर्तनाच्या चळवळीतील एक शिलेदार... राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, शोषित जन आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन समिती ते आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी.. चांगल्या प्रामाणिक व्यक्तींनी राजकारणात यावे, हा प्रयत्न